Wednesday 9 October 2024

श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान: काव्य

श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान : काव्य

Image source : Wikipedia

ऐका ऐका जन हो सारे
कथा तुम्ही आदिमातेची
भक्तांना प्रिय असे सर्वदा
कहाणी श्री महालक्ष्मीची॥१॥


अशुभाचा जी नाश करी ती
अशुभनाशिनी तिज म्हणती
महिषासूरवध केला म्हणुनी
महिषासूरमर्दिनी म्हणती॥२॥


आरंभ कथेचा करूया आपण
ऋषी कश्यपां पासूनी
प्रतिरूप ब्रम्हर्षी मरिचीचे
 हेचि घेऊया जाणोनी॥३॥


भार्या दोन तयाच्या नामे
अदितीमति अन् दिती असती
श्रध्दावान अदितीमति तर
दिती असे सौंदर्यवती॥४॥


दिव्य तपोबल आदितीमतिचे
ईश्वरभक्ती तिच्या मनी
गुरूकुल आणिक पतिसेवेतून
जन्म घेतला देवांनी॥५॥


सात्विक तेज, पाहुनी सवतीचे
दिती पेटली द्वेषानी
क्रोध तिचा अन् मत्सर  मिळूनी
जन्म घेतला दैत्यांनी॥६॥


दितीपुत्र हिरण्यकष्यपु
त्यास विकल्पाने वरिला
कामुकता अन् भोग मिळोनी
अनुह्राद  दैत्य जन्मा आला॥७॥


दैत्येश्वर अन् विश्वनियंत्रक
वाटे व्हावे दैत्याला
याच राक्षसी इच्छेपोटी
महिषी आली जन्माला॥८॥


उन्मत्त होऊनी उन्मादाने
महिषीशी तो रत झाला
अनुचित अन् अपवित्र रतीतून
महिषासूर जन्मा आला॥९॥


जनक असे अशुभाचा आणिक
ढोंग आणखी कपटाचा
दुर्गुण पाहुनी हर्ष वाढला
दिती विकल्पा दोघींचा॥१०॥


मरिचींच्या यज्ञस्थळी जाऊनी
कपटाने वर मागितला
स्वकेश अर्पूनी यज्ञामध्ये
अजिंक्य महिषासूर केला॥११॥


पराभूत इंद्रासह केले 
त्या दैत्पाने देवांना
जिंकुनिया अवघ्या पृथ्वीला
गुलाम केले राजांना॥१२॥


देव धावूनी भर्गलोकी मग
परमात्म्यासी शरण आले
तारकमंत्राचा जप  करण्या
देवांसी हरिहर वदले॥१३॥


वृध्दिंगत होता जप सारे
अष्टभाव जागृत झाले
अंकुर-ऐश्वर्य प्रवाहित होऊनी
भर्गरुपाने अवतरले॥१४॥


आदिमातेचे तेज मिसळूनी
महातेज अतिदिव्य असे
त्या तेजातून प्रकट  होई जी
अभूतपूर्व आकृती दिसे॥१५॥


तिच असे जी ब्रम्हविलासिनी
महात्रिपुरांबा तिज म्हणती
अखिल विश्व तिज म्हणे ईश्वरी
हरिहर तिज आई म्हणती॥१६॥


त्या महालक्ष्मी रूपासी पाहुनी
सृष्टी आनंदुनी गेली
देवांनी तिज प्रतिक रूपांनी
दिव्य आयुधे अर्पिली॥१७॥॥


अष्टादश  आयुधे पाहुनी
हरिहर आनंदित झाला
देवीसिंहस्वरुप होऊनी
ॐ नमश्चन्डिकायै गर्जला॥१८॥


सिंहारुढ महालक्ष्मी माता
पृथ्वीतलावरी अवतरली
आश्रमात ती कर्दम ऋषींच्या
पवित्र स्थानी स्थिरावली॥१९॥


अतिपावन कतराज आश्रमी
पाऊल प्रथम तिचे पडले
म्हणोनीच मग कात्यायनी हे
नाम तिचे पारचलित झाले॥२०॥


आरंभ करोनी घंटानादा
मोहित केले असूरांना
करोनिया क्षीण बळ अशुभाचे
भयभीत केले दैत्यांना॥२१॥ 


महिषासूर भानावर आला
आज्ञा केली सैन्यासी
सेनापती आले ते करण्या
पराभूत आदिमातेसी॥२२॥


दुर्वृत्तींचे आगर असती
कपट तयांच्या ठायी वसे
प्रमुख असे असिलोमा त्यांचा
फितुरी ज्याचा प्राण असे॥२३॥


अष्टादश आयुधे रोखुनी
प्रहार मातेने केले
सेनापतींसी वधुनी त्यांना
यमसदनासी पाठविले॥२४॥


असिलोमा निःशस्त्र बनोनी
मातेवर धावूनी आला
प्राशुनी त्याच्या रक्ता तत्क्षणी
देवीसिंह मोदे गर्जला॥२५॥


महिषासूर युध्दात उतरला
नाश कराया मातेचा
विविध रूपे मायावी घेई
करी वापर तो कपटाचा॥२६॥


 महिष बनोनी महिषासूर तो
मातेवरी धावुनी गेला
मातेने बनवुनी ʼअग्नीकंकणा ʼ
बंदी त्यामाजी केला॥२७॥


वेगाने उड्डाण करोनी
कंठकुपावरी पाय दिला
त्रिशुल रोखुनी ह्रदयावरती
देह छिन्नविछिन्न केला॥२८॥


रक्षी शुभ अन् संपवी अशुभा
अद्भभुत कंकण गौरविले
ʼमणीभद्र ' असे त्या नाम देऊनी
धारण मातेने केले॥२९॥


सुरवर आणिक ऋषीमहर्षी
गर्जु लागले हर्षाने
जयजयकार करूनी मातेचा
उधळू लागले स्तुतीसुमने ॥३०॥


प्रसन्न होऊनी आदिशक्तीने
त्यांसी दोन वरां दिधले
शरण येऊनी हाक मारिता
सत्वर येईन वचन दिले ॥३१॥


जो कुणी गाईल तिचे स्तोत्र अन्
प्रेमाने आख्यान तिचे
नाश करील ती दुःखांचा अन्
वृध्दिंगत वैभव त्याचे ॥३२॥


हे आई वात्सल्यचण्डिके
हेचि मागणे मी मागे
जन्मोजन्मी मी गर्जावे
जय जगदंब जय दुर्गे !!
जय जगदंब जय दुर्गे!!॥३३॥


- डाॅ. प्रिया कर्णिक.

 ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥


श्री अशुभनाशिनी नवरात्राच्या निमित्ताने, मी आपणा सर्वांना, श्री महिषासूरमर्दिनीचे आख्यान, काव्यरुपात कथन करण्याचा प्रयत्न करते आहे. अर्थात या कवनातील प्रत्येक शब्द माझे सद्गुरू प. पू. श्री अनिरूध्द लिखित "मातृवात्सल्यविन्दानम्" या परमपवित्र

ग्रंथाचा आधार घेऊनच लिहिलेला आहे. म्हणूनच हे काव्य मी श्री आदिमाता महिषासूरमर्दिनी आणि प. पू. अनिरूध्दांच्या चरणी अंबज्ञतेने  अर्पण  करते.

- डाॅ. प्रिया कर्णिक.

 ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ ॥नाथसंविध॥